७ किलोमीटर पाठलाग करून ट्रकला पकडले
गंगापूर, (प्रतिनिधी ) : छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला फाट्यानजीक झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
गंगापूर तालुक्यातील संभाजीनगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दहेगाव बंगला फाट्याजवळ मंगळवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास एका भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी ट्रकचालक अजित शंकर यादव (रा. बरगोनिया, जि. बाका, बिहार) याला पकडून वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू उत्तम नामेकर (वय ४५) व बाबासाहेब शिंदे (वय ५२, दोघेही रा. दहेगाव) हे दुचाकी (क्र. MH20HE5129) वरून दहेगाव बंगला फाट्यावरून दहेगावकडे जात होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र. WB11E0203) रस्ता ओलांडत असलेल्या त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दोघेही ट्रकच्या खाली आले. या भीषण अपघातात राजू नामेकर व बाबासाहेब शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत राजू नामेकर हे पेंटिंगचे तर बाबासाहेब शिंदे हे दहेगाव ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी होते. राजू नामेकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले, तर बाबासाहेब शिंदे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत सोनवणे पुढील तपास करीत आहेत
-- ७ किलोमीटर पाठलाग करून ट्रकचालकाला पकडले --
अपघात घडताच ट्रकचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, उपस्थित नागरिक आणि ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकींवरून सुमारे ७ किलोमीटर पाठलाग केला. अखेर गंगापूर फाटा येथे ट्रक अडवून चालकाला पकडण्यात आले.
दहेगावसाठी हा अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग आहे. या अपघातात गावातील दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी आमची मागणी आहे.
- विक्रम राऊत , सरपंच, ग्रामपंचायत दहेगाव













